Thursday, August 2, 2012

अण्णांच्या जन आंदोलनाचा अकाली मृत्यू !!!

दुसऱ्या स्वातंत्रलढ्याची घोषणा देत अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमने  ज्या मागण्यांसाठी उपोषण केले त्या मान्य होण्यापूर्वीच उपोषणाचे नाटक गुंडाळणार असल्याचे जाहीर केले आहे ... उपोषणाची घोषणा करत असताना अण्णा हजारे यांनी नवीन राजकीय पर्याय देण्याची घोषणा केली . ही घोषणा म्हणजे अण्णा हजारे यांच्या जन आंदोलनाने ओढवून घेतलेला आत्मघात आहे...अण्णा निवडणूक प्रक्रियेतून निवडून आलेले जनप्रतिनिधी नाहीत व त्यामुळे त्यांना कायदा करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचा घटनादत्त अधिकार नाही. अण्णा हजारे हे घटनाबाह्य दबावतंत्र वापरत आहेत ...विचारांवर विश्‍वास असणाऱ्या त्यांच्या अनुयायांनी हे लक्षात घेऊन आपल्या लढ्याची दिशा थोडी बदलायला हवी. निवडणूक प्रक्रियेतून निवडून येण्याचा मार्ग पत्करायला हवा. आज अण्णांसारखे नेतृत्व आहे. त्यांनी व्यापक जनहितासाठी भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन कधीच छेडले आहे; पण ते पुरेसे नाही. राजकीय व्यवस्थाच बदलण्यात आपण पुढाकार घ्यायला हवा. अण्णा टीम; तसेच किरण बेदी आदी लोकांनी एकत्र येऊन राष्ट्रीय पातळीवर राजकीय पक्षाची स्थापना करून ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये सहभागी होऊन जनतेसमोर जावे...अशी भूमिका मी सुरुवातीपासून मांडत आलो आहे ...आज अण्णा आणि त्यांची टीम राजकीय पर्याय देण्याची भाषा करू लागला आहे. मात्र मिडीयाला हाताशी धरून जन आंदोलन करणे आणि प्रत्यक्षात राजकीय कुरुक्षेत्रावर बाजी मारणे यात खूप फरक आहे . हे टीम अण्णाला लवकरच समजेल .गेल्या सोळा महिन्यांपासून टीम अण्णाच्या राजकीय महत्वाकांक्षा वाढल्या होत्या . त्या कधीच लपून राहिलेल्या नव्हत्या . अण्णांच्या आंदोलनाच्या दोऱ्या   दोऱ्या ज्यांच्या हातात आहेत त्यांनीच आता  हा आत्मघात घडवून आणला आहे. भ्रमनिरास, निराशा, शल्य सलत गेले , अखेर टीम अण्णाने  आत्मघात ओढवून घेतला. ... हा वैचारिक गुंता न सुटणं हाच आत्मघात ठरला....भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादातून चळवळींचे  राजकारण करू पाहणाऱ्यांना नक्कीच हुरूप आला असेल. राजकीय पक्षांच्या पलीकडे राजकारण चालणं हे लोकशाहीच्या विस्ताराचं लक्षण आहे. अशा चळवळींनी राजकारण जास्त व्यापक बनू शकते  असे नाही . अण्णा हजारे यांनी दुसऱ्या क्रांतीची भाषा केली आहे .  जयप्रकाश नारायण यांनीही याया पूर्वी संपूर्ण क्रांतीची घोषणा केली होती . जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधी यांच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध देशाला उभे केले, रान पेटविले; पण त्यांनी देशाची घटना व कायदा बदला असे कधीच सांगितले नाही. अण्णांनी तर संसद हा चोरांचा अड्डा आहे असे म्हटले ....जयप्रकाश नारायण यांनी कायदा व घटनेच्या चौकटीतच त्यांनी इंदिरा गांधी व त्यांच्या कॉंग्रेस सरकारविरुद्ध युद्ध पुकारले व इंदिरा गांधींचा दारुण पराभव केला. जयप्रकाश यांच्यावेळी ‘मीडिया’ आजच्याइतका प्रभावी नव्हता. चोवीस तास ‘उपोषणांना’ प्रसिद्धी देणारी टीव्ही चॅनल्स नव्हती. वृत्तपत्रेही मर्यादित होती. जी होती ती इंदिरा गांधींची अंकित होती. तरीही जयप्रकाश नारायण यांनी देशातील जनतेला लढ्यासाठी एकत्र आणले. अण्णा हजारे हे करू शकतील का ? टीम अण्णांच्या नव्या भूमिकेवर अद्याप भाजपने तोंड उघडलेले नाही . बाबा रामदेव सुद्धा मिठाची गुळणी घेऊन बसला आहे . टीम अण्णाचे जहाज भरकटले आहे.

1 comment: